सहजंच एक विचार आला आज मनात - मी मेलो आज तर काय होईल?
खरंतर हा 'तर' खरोखर अनावश्यक. 'मेलो तर' नाही, एक ना एक दिवस 'मरायचंच' आहे. त्यातुन सुटका नाही.
मग नक्की कशाबद्दल गुढ, कुतुहल, भिती वाटते?
मरण्याबद्दल की 'आज' नाहीतर 'उद्या' मरण्याबद्दल?
कुठेसं वाचलं होतं की मरणाला माणुस भितो, कारण मरणाला 'उद्या' नसतो.
तसं पहायला गेलं तर ह्याआधीही दोनवेळा झालीच आहे की भेट त्याच्यासोबत. लहाणपणी एकदा पाण्यात बुडुन कसाबसा वाचल्यावर आणि आत्ता काही वर्षांपुर्वी उलटलेल्या कार मध्येे,
वेड्यावाकड्या पलट्या घेताना झालेली काही सेकंदांची, धावती पण नेहमीकरता लक्षात राहणारी त्याची भेट....
असो. मुळ प्रश्नाकडे परत येताना - खरंच काय होईल मी मेलो आज तर?
आजुबाजुचे रडतील, खासकरुन जवळचे नातेवाईक. मग होत जाईल सर्वांना सवय हळुहळु. नाही म्हणायला फॅमिलीला होईल जास्त त्रास पण काळ सगळ्यावर औषध आहे म्हणतात. फेसबुकवरच्या Rest in Peace किंवा इन शॉर्ट RIP च्या काही दहाबारा पोस्ट्स, काही जुन्या आठवणी, चांगला, होतकरु फोटोग्राफर वगैरै स्तुतीसुमनं, काही खरी आणि बरीचशी केवळ बोलायचं म्हणुन..
पण पुढे काय? असे कोणते तीर मारलेत आपण की कोणी आपली रोज नव्हे, पण कमीतकमी ५-६ महिन्यांत एकदातरी आठवण काढावी? असं काही केलंय का आपण जे आपल्यानंतर किमान काही वर्ष तरी टिकेल? ज्यामुळे कोणाचं तरी जिवन जास्त आनंदी होईल?
मुळात आपलं नाव कोणीतरी घ्यावं ही अपेक्षा तरी का म्हणुन ठेवावी?
आणि हा सगळा विचार सुरु उद्याचा. आजचं काय?
हातात असलेला क्षण माझा, त्याचं सोन करणं माझ्या हातात.
बाकी उद्याच्या, परवाच्या, मरणाच्या गोष्टी गेल्या तेल लावत..!
